इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : गेल्या काही काळापासून महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याने तातडीने पुणे महापालिकेचे विभाजन करून दोन महापालिका कराव्यात अशी मागणी करण्यात येत होती. याचदरम्यान आता मंत्री उदय सामंत यांनी पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या लगतच्या ३२ गावांसाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्यामार्फत विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती विधान परिषदेत दिली आहे.
विधान परिषदेचे सदस्य योगेश टिळेकर यांनी पुणे शहराच्या हद्दीलगत असलेल्या ३२ गावांचा पुणे महापालिकेत समावेश झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे विभाजन करुन पूर्व पुण्यासाठी नवीन महानगरपालिका निर्माण करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट ३२ गावांपैकी ११ गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगरपालिकेमार्फत तयार करण्याची कार्यवाही सुरू होती. विकास आराखड्याची मुदत संपल्याने सध्या शासनामार्फत त्यावर पुढील कार्यवाही चालू आहे.
तसेच समाविष्ट २३ गावांसाठीचा विकास आराखडा पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या गावांना पाणीपुरवठा, विद्युत, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, मलनिःसारण प्रकल्प आदी सुविधा उपलब्ध करुन विकासात्मक न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरूनच आता हे स्पष्ट झाले आहे की, महापालिकेचे विभाजन सध्या तरी होणार नाही.