इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः भारताच्या गौरवशाली इतिहासातील ‘अजेय योद्धा’ म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), खडकवासला येथे उभारण्यात आला आहे. ४ जुलै रोजी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार आहे. पेशव्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या उद्देशाने हा पुतळा उभारला आहे. तब्बल १३.५ फूट उंचीचा आणि चार हजार किलो वजनाच्या ब्राँझचा वापर करून, शिल्पकार विपुल खटावकर यांनी या भव्य पुतळ्याला साकारले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानने मंगळवारी (१ जुलै) दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम भारताच्या शौर्य परंपरेला आदरांजली असेल.
“राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थीना अजेय योद्धा पेशवे यांचा हा भव्य पुतळा कायम प्रेरणादायी ठरेल,” अशी भावना प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पेशव्यांचे आयुष्य अवघे ४० वर्षांचे असले तरी, त्यांनी लढलेल्या प्रत्येक युद्धात विजय मिळवून इतिहास घडवला. त्यांची ही ‘अजेय’ गाथा सर्वांना प्रेरणा द्यावी म्हणून श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा भावी पिढ्यांना शौर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांची आठवण करून देईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, हा अनावरण सोहळा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार असून, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारसह अनेकांची विशेष उपस्थिती असणार आहे. पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा आणि एनडीएचे कमांडंट डमिरल गुरचरण सिंह हेही या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.