इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बुलढाणाः शिक्षकाने वर्गात केलेल्या अपमानामुळे आणि आई-वडिलांना उद्देशून वापरलेल्या अपमानास्पद शब्दांमुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अपमान असह्य झाल्याने गळफास घेतला. वसाडी गावात असलेल्या जय बजरंग विद्यालयात घडलेल्या या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोपाल सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाने विवेक राऊत नावाच्या विद्यार्थ्याला वर्गात एका प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. यावरून त्याला १०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. परंतु शिक्षकाचा राग इथेच थांबला नाही. त्याने विवेकच्या आई-वडिलांचाही अपमानास्पद उल्लेख करत, “तुझी चड्डी काढायला लागते का?” असे बोलल्याने विद्यार्थ्याला सहन झाले नाही.
विवेक तात्काळ घरी निघाला, घरी पोहोचताच त्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिले आहे की, “मी फाशी घेतो, कारण मला सूर्यवंशी मास्तर खूप बोलला. तो माझ्या आई-वडिलांना देखील खूप बोलला म्हणून मी फाशी घेतो.” या चिठ्ठीने घटनेचे गांभीर्य अधिकच वाढवले आहे. या हृदयद्रावक घटनेची माहिती गावात पसरताच, विवेकचे नातेवाईक आणि संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. आपल्या मुलाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या शिक्षक गोपाल सूर्यवंशीला जमावाने बेदम मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करत आहे.