इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात, खाद्यतेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय तणाव, विशेषतः इराण-इस्राईल संघर्षाचे पडसाद आता थेट किराणा दुकानात उमटताना दिसत आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.
सर्व प्रकारच्या खाद्यतेलाचे भाव घाऊक बाजारात प्रति किलो ३ ते ४ रुपयांनी वाढले आहेत. याचा थेट परिणाम १५ लिटर डब्याच्या किमतीत ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. इराण-इस्राईलमधील परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात असली तरी, समुद्रातील काही महत्त्वाचे व्यापारी मार्ग अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाहीत. यामुळे पुरवठा साखळीवर ताण येत असून, त्याचा परिणाम किमतींवर होत आहे. पाम आणि सूर्यफूल तेलाच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, शेंगदाणा तेल वगळता अन्य सर्व खाद्यतेलांच्या १५ किलो आणि लिटरच्या डब्यामागे ५० ते ६० रुपयांची वाढ झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी कच्च्या आयात तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांनी कमी केले होते, ज्यामुळे खाद्यतेलाचे भाव काही प्रमाणात खाली आले होते. मात्र, जागतिक अस्थिरता आणि खनिज तेलाच्या वाढलेल्या किमतींनी या कपातीचा फायदा मर्यादित ठरवला आहे. खोबरेल तेलाच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. नारळाचे उत्पादन घटल्याने आणि खोबऱ्याचे भाव वाढल्याने २५ किलो खोबरेल तेलाचा डबा आता ६ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात चढेच राहण्याची शक्यता असल्याने, स्थानिक बाजारातही ही तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक झळ बसण्याची चिन्हे आहेत.