इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : श्री साईबाबा पालखी सोहळ्याच्या गर्दीत चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ९१ हजार रुपयांची सोनसाखळी लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२९ जून) फडके हौद परिसरात घडली. याप्रकरणी नारायण पेठेतील राहिवासी असलेल्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या साईबाबा पालखी सोहळ्यात सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पालखी मार्गस्थ झाली. या सोहळ्याच्या दर्शनासाठी आलेल्या तक्रारदार महिला गर्दीत सहभागी झाल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली.
घटनेनंतर सोनसाखळी चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.