इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील येरवडा भागातून एक बातमी समोर आली आहे. येथे महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करुन तिला त्रास देणारा, तसेच विनयभंग करणाऱ्या रोड रोमिओला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. साहिल याकुब सय्यद (वय २४, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीच्या बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी सय्यद हा जानेवारी महिन्यापासून तीचा पाठलाग करत होता. त्याने महाविद्यालयाच्या आवारात जाऊन युवतीला धमकावून तिला मोटारीत बसायला सांगितले. आरोपीने पीडित युवतीसोबत छायाचित्र काढले, तसेच तिच्याशी अश्लील वर्तनही करण्याचा प्रयत्न केला. अखेर या प्रकाराला घाबरलेल्या तरुणीने आपल्या मोठ्या बहिणीला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सय्यद याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक देवकर तपास करत आहेत.
दरम्यान, शाळकरी मुली, महाविद्यालयीन युवतींना अशा रोड रोमिओने त्रास दिल्यास त्यांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.