इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खराडीः जुना मुंढवा रस्त्यावरील राघवेंद्र ड्रायक्लीनर्ससमोर आज (शुक्रवार) गटार वाहिनीच्या दुरुस्तीसाठी सुरू असलेल्या कामादरम्यान जेसीबीचा फटका बसल्याने गॅस वाहिनी फुटली आणि मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला, मात्र परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक नागरिकांनी घटनेमागे एमएनजीएलच्या कामातील त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, गॅस वाहिनी नियमाप्रमाणे एक मीटर खोलीवर टाकण्याऐवजी ती केवळ एक ते दीड फूट अंतरावर टाकली होती. यामुळेच हा अपघात घडल्याचे ते म्हणाले. भूमिगत सेवा वाहिन्यांच्या कामातील सुरक्षिततेच्या मानकांचे योग्य पालन न केल्यास अशा घटना पुन्हा घडू शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी चेंबर भरले होते, ज्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू होते. सिमेंट पाइप टाकण्यासाठी खोदकाम करत असताना हा संपूर्ण प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि एमएनजीएल कंपनीचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने गॅस पुरवठा बंद केला आणि युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. गळती थांबवून अवघ्या काही वेळातच परिस्थिती पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे शहरात सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान सुरक्षिततेचे निकष पाळले जात आहेत का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.