इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबईः राज्यभर धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजावरून काही काळापूर्वी राजकीय वाद निर्माण झाला होटा, ज्यात मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, आता या वादावर मुंबई पोलिसांनी अत्यंत प्रभावीपणे काम करून अनेक ठिकाणचे भोंगे उतरवले आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एका विशेष मोहिमेअंतर्गत, शहरातील विविध भागातील (मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारे) तब्बल १५०० धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले आहेत. ही कारवाई इतकी शांततेत पार पडली की, मुंबईसारखे विशाल महानगर कोणत्याही गदारोळाविना ‘भोंगामुक्त’ झाले आहे, जे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
या मोठ्या मोहिमेमागे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सक्रिय पाठिंबा आणि मुंबई पोलीस दलाची दृढ इच्छाशक्ती कारणीभूत ठरली. पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे, फडणवीस स्वतः दररोज या कामाचा आढावा घेत होते आणि मोहिमेत येणारे अडथळे दूर करण्यासाठी ते संबंधित नेत्यांशी आणि धर्मगुरूंशी थेट संवाद साधत होते. यामुळे धार्मिक भावना न दुखावता, सलोख्याचे वातावरण कायम ठेवत, ही गुंतागुंतीची समस्या मार्गी लागली.
पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी या यशाचे श्रेय देताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या संवेदनशील विषयाला राजकीय वळण न देता, तो शांत पद्धतीने हाताळण्यावर भर दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे सर्वच समाजातील नेत्यांनी आणि धर्मगुरूंनी पोलिसांना सहकार्य केले. परिणामी, कोणत्याही मोठ्या विरोधाशिवाय किंवा संघर्षाशिवाय सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्यात यश आले. मुंबईतील धार्मिक सलोखा कायम ठेवत, ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावण्याची ही कारवाई निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.