इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पावसाळा सुरू होताच पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेसमोर एक नवे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शहरातील दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये कॉलरा, डायरिया, टायफॉइड आणि काविळीच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यासोबतच, लेप्टोस्पायरोसिससारख्या जिवाणूजन्य आजारांनीही पुन्हा डोके वर काढल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पिण्यासाठी शुद्ध आणि कोमट पाणी पिण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. विशेषतः, शहराच्या काही भागांमध्ये जलजन्य आजारांचे रुग्ण अधिक वाढत आहे.
गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने नागरिकांना तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी पुणेकरांना शुद्ध आणि कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
“सार्वजनिक ठिकाणी बाहेरचे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.” तसेच, कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे. पावसाळ्यातील हे आरोग्य संकट टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेवर भर देणे आणि पिण्याच्या पाण्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.