इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा आपले रौद्र रूप दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यभर कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत असून, भूस्खलनाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भोरमार्गे थेट महाडला जोडणारा प्रसिद्ध वरंध घाट, पुढील तीन महिन्यांसाठी अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश तातडीने जारी केले आहेत.
वरंध घाट हा निसर्गरम्य ठिकाण म्हणून जेवढा प्रसिद्ध आहे, तेवढाच तो धोकादायकही आहे. घाटात तीव्र उतार, वळणावळणाचे रस्ते आणि सततच्या पावसामुळे दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, रस्त्याला तडे जाणे अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. विशेषतः सध्या घाटातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रस्ता आणखी धोकादायक बनला आहे. दरम्यान, हेच धोके ओळखून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने अवजड वाहतुकीसाठी हा घाट पूर्णपणे बंद केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, फक्त अवजड वाहनांनाच नाही तर, हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ किंवा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला, तर वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील. या निर्णयामुळे प्रवाशांना आता पर्यायी मार्गाचा विचार करावा लागणार आहे.