इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरीः शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या १६ जूनपासून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आता बस पास मिळवण्यासाठी लांब रांगांमध्ये उभे राहण्याची गरज पडणार नाही, तर त्यांचा पास थेट शाळेतच उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सोमवार, १६ जूनपासून (२०२५) नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने उद्यापासून शाळेत पासचे वाटप केले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात ६६ टक्के सवलत दिली असून त्यांना केवळ ३४ टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
पुणे विभाग नियंत्रक, अरुण सिया यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना आता एसटी बसचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची नोंद घेऊन सोमवारपासून हे पास वितरित करण्याच्या सूचना सर्व आगार प्रमुखांना आणि स्थानक प्रमुखांना दिल्या आहेत.”
या मोहिमेसाठी एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना व प्राचार्यांना पत्र पाठवून नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची यादी देण्यास सांगितले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत पास मिळण्यास मदत होणार आहे.