इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामतीः बारामती येथे एका महिला पोलिसने विद्यार्थ्यांचे दप्तर आणि मोबाईल चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित महिला पोलीसाविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.
स्थानिक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राजेंद्र जगन्नाथ हगवणे (रा. माळेगाव, ता. बारामती) या विद्यार्थ्याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. राजेंद्रच्या म्हणण्यानुसार, 29 मे रोजी तो आणि त्याचा मित्र मयूर बाळासाहेब वायकर हे दोघे परीक्षा देण्यासाठी जात असताना मोबाईल फोन त्यांनी दप्तरात ठेवला आणि ते परीक्षा देण्यासाठी वर्गात गेले. परीक्षा संपल्यानंतर परत येताच, त्यांना त्यांचे दप्तर दिसले नाही. या प्रकरणी त्यांनी तात्काळ महाविद्यालयाच्या प्राचार्यांना माहिती दिली. प्रशासनाने तातडीने महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक धक्कादायक सत्य समोर आले. फुटेजमध्ये आकांक्षा विजय गाढवे (रा. बारामती) या महिलेने दप्तर नेल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
राजेन्द्रने आकांक्षा गाढवे यांच्याशी संपर्क साधून मोबाईल आणि दप्तराची मागणी केली. मात्र, आकांक्षा गाढवेने काही केले नसल्याचे सांगितले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर हगवणे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.