इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे स्थानकावरून दररोज ६० ते ७० गाड्या धावतात. पुणे-हडपसर दरम्यान तिसऱ्या मार्गिकच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. यामुळे सोलापूर आणि मिरजवरुन येणाऱ्या रेल्वे गाड्या थेट स्थानकात येण्यास मार्ग मोकळा होणार आहे. तसेच प्रवाशांचा वेळ आता वाचणार आहे.
दरम्यान, पुणे स्थानकावर रेल्वे गाड्यांचे इंजिन बदलणे (शंटिंग) सुरू असते. यामुळे १५ ते २० मिनिटांचा वेळ लागतो. याचा परिणाम प्रवासी गाड्यांच्या वेळेवर होतो. इंजिन बदलताना फलाट उपलब्ध नसल्याने दररोज किमान ५० गाड्यांना सिग्नलवर १० ते १५ मिनिटे थांबून राहावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. यामुळे रेल्वेच्या परिचालन विभागाने हडपसर ते पुणेदरम्यान तिसऱ्या मार्गिकचा व कोचिंग डेपो तिसऱ्या मार्गिकला जोडण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी दिला होता. या तिसऱ्या मार्गिकेला घोरपडीतील कोचिंग डेपोला जोडण्यात येणार आहे.
सध्या घोरपडी, पुणे स्थानकावर रेल्वे आणण्यासाठी मिरज व सोलापूर मार्गिकचा वापर करावा लागत आहे. तिसऱ्या मार्गिकेचा काम पूर्ण झाल्यावर एक लाईन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सोलापूर आणि मिरजकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांना लवकर सिग्नल मिळण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, रेल्वे गाड्यांना लागणार वेळ बंद होणार आहे.
याबाबत पुणे विभागाचे अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांनी सांगितले की, पुणे-हडपसर दरम्यान तिसऱ्या मार्गिकच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापुढे रेल्वे गाड्यांना होणारा विलंब टाळणार आहे.