इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रायगड : गेल्या काही दिवसापासून राज्यात वारंवार खून, अत्याचार, हाणामारी अशा गुन्हेगारी घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यात कोयत्याने सपासप वार करत गर्लफ्रेंडची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर रक्ताने माखलेल्या अंगाने बॉयफ्रेंडने गळफास घेत आयुष्य संपवले. या धक्कादायक घटनेने रायगड जिल्हा हादरला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेखर दुधाणे आणि पौर्णिमा अशी मृताची नावे आहेत. सुधारगड तालुक्यातील परळीत ही थरकाप उडवणारी घटना घडली. प्रियकर शेखर दुधाणे आणि त्याची प्रेयसी पौर्णिमा यांच्यातील नातेसंबंध गावात सर्वश्रुत होते. पौर्णिमा परळी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. मंगळवारी रात्री शेखर नर्सिंग होममध्ये पोहोचला आणि पौर्णिमावर कोयत्याने अनेक वार करून निघृण खून केला. यानंतर, त्याने तिथेच गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांनी कोयता आणि इतर साहित्य जप्त केले आहे. शेखर याने गर्लफ्रेंडची हत्या का केली? त्याने टोकाचे पाऊल का उचलले? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.