इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. येथे वयोवृद्ध पतीची काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या दोन ‘केअर टेकर्स’ नी घरातील चेक चोरून त्यावर बनावट सह्या करून तसेच एटीएमकार्डच्या माध्यमातून पैसे काढून तब्बल 35 लाख 51 हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. आकाश ज्ञानेश लिमकर (रा. वारजे माळवाडी) आणि आदित्य संजय मोरे (रा. पाषाण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत गिरिजा बाला चंद्रन (वय 71 वर्ष, रा. पाषाण) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यातदार गिरिजा चंद्रन यांनी आपल्या पतीची काळजी घेण्यासाठी आकाश आणि आदित्य यांना ‘केअर टेकर’ म्हणून कामावर ठेवले होते. सप्टेंबर 2023 ते मार्च 2025 या कालावधी दरम्यान या दोघांनी गिरिजा यांच्या वयोवृद्ध पतीचे चेकबुक आणि एटीएम कार्ड चोरले. तसेच चेकवर त्यांच्या पतीच्या खोट्या सह्या केल्या आणि त्याच्यावरून वेळोवेळी पैसे काढले.
अश्याप्रकारे मागच्या दीड वर्षात आरोपींनी चेक आणि एटीएममधून तब्बल 35 लाख 51 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. हा घडलेला प्रकार गिरिजा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने चतुः शृंगी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.