इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
महाराष्ट्र विधासभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी घेत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे राजीनामा देणार आहेत, अशी सध्या चर्चा सुरु आहे. पण असा कुठलाही निर्णय पटोले यांनी घेतलेला नाही, असं त्यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.
पटोलेंच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण
नाना पटोले यांच्या कार्यालयानं हे स्पष्ट केलं की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या राजीनाम्याची बातमी ही अफवा आहे. या संदर्भातील बातम्या असत्य असून खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेससह महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. यामध्ये काँग्रेसला १६, राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला १९ जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असताना आणि लोकसभेत राज्यात सर्वात मोठा पक्ष राहिलेला असतानाही विधानसभेला मात्र राज्यात मोठा पराभव झाला आहे.
दरम्यान, राज्यातील पराभावाची काय कारणं असू शकतील याचं विश्लेषण करण्यासाठी नाना पटोले हे दिल्लीला वरिष्ठांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच वेळी ते पराभवाची जबाबदारी स्विकारुन राजीनामा देतील, असं बोललं जात होतं.