इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी : विधानसभेच्या जातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघातून आमदार अण्णा बनसोडे विजयी झाले आहेत. त्यांना एक लाख ८ हजार ९४९ मते मिळाली. शेवटच्या विसाव्या फेरी अखेर त्यांनी ३६६९८ मतांची आघाडी घेत विजयी घौडदौड कायम ठेवली.
पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात सरळ लढत झाली. अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे तर शरद पवार गटाकडून सुलक्षणात शिलवंत निवडणूक रिंगणात होते. बुधवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत पिंपरी मतदारसंघात दोन लाख दोन हजार ७६६ मतदारांनी मतदान केले. यात सुलक्षणा शिलवंत यांना ६९२५१ मते मिळाली. बालेवाडी येथे शनिवारी सकाळी आठ वाजता पासून मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. यात पहिल्या फेरीपासून अण्णा बनसोडे यांनी मतांची आघाडी कायम ठेवली.
मतमोजणीच्या २० फेऱ्या झाल्या. दरम्यान, टपाली मतदान दुपारपर्यंत जाहीर करण्यात आले नव्हते. बनसोडे यांनी शेवटच्या विसाव्या फेरी अखेर एक लाख आठ हजार ९४९ मते मिळवून ३६ हजार ६९८ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.
कार्यकर्त्यांकडून जल्लोष
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. तसेच अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर देखील गुलाल उधळण्यात आला.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी कुठलीही लढत नव्हती. > तसे केवळ चित्र उभे केले गेले होते. मात्र राज्यात जशी एकतर्फी महायुतीची सत्ता आली तसा माझा विजय देखील एकतर्फी झालेला आहे. हे विरोधकांना मान्य करावेच लागेल. पुढील काळात पिंपरी -चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादीची पुन्हा एकदा सत्ता आणू, असा विश्वास आहे. – अण्णा बनसोडे, आमदार तथा विजयी उमेदवार, पिंपरी विधानसभा मतदारसंघ