इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत ३५ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्र आणि १० विधानसभा मतदारसंघांत ५३ मतदान केंद्रांच्या नावात तर २९ मतदान केंद्रांच्या जागेत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनील कळसकर यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती, पुरंदर, चिंचवड, भोसरी, वडगावशेरी, खडकवासला आणि हडपसर अशा १० विधानसभा मतदारसंघातील साहाय्यकारी मतदान केंद्रे, मतदान केंद्राच्या नावात आणि जागेत बदल करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. ३४१ मतदान केंद्र असलेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ५ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्र वाढली असून, एकूण मतदान केंद्रांची संख्या ३४६ इतकी झाली आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघातील ४५७ केंद्रांमधील १९ मतदान केंद्रांच्या नावात बदल करण्यात आला आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघात ३१० मतदान केंद्रात ३ साहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ झाली असून, एकूण ३१३ मतदान केंद्र असणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातील ३८६ मतदार केंद्रातील २ मतदान केंद्राच्या जागेत बदल केला आहे. ४१३ मतदान केंद्र असलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघात ५ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ झाली असून, एकूण संख्या ४१८ इतकी झाली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५६१ मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये ३ साहाय्यकारी मतदार केंद्राची वाढ झाली असून, २१ मतदान केंद्राच्या नावामध्ये बदल केला आहे, त्यामुळे आता ५६४ मतदान केंद्र झाली आहेत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात ४८३ मतदान केंद्रामध्ये ९ साहाय्यकारी मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण ४९२ मतदान केंद्र असतील, वडगावशेरीमध्ये ११ साहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ झाली असून, एकूण मतदान केंद्र ४४८ इतकी झाली आहे. ५०५ मतदान केंद्र असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये २ नवीन साहाय्यकारी मतदान केंद्र झाली असून, आता ही संख्या ५०७ इतकी झाली आहे. तर ८ मतदान केंद्रांच्या नावात आणि २० मतदान केंद्रांच्या जागेमध्ये बदल केला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात ५२५ मतदान केंद्र होते, त्यात ७ साहाय्यकारी मतदान केंद्रांनी वाढ झाली असून, आता ५३२ मतदान केंद्रे असणार आहेत, अशी माहितीही निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.