इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालकाने नवीन कुत्रा आणल्याने केअरटेकरने जुन्या कुत्र्याला हाकलून देऊन, तसेच त्याच्या डोक्यात लाकडी बांबुने मारहाण करुन त्याचा जीव घेतला. दरम्यान त्यानंतर खड्ड्यात टाकून त्याला जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी मुंढव्यातील आर एस इंटरप्रायझेसच्या शेजारील झेड कॉर्नर येथे घडली आहे.
या प्रकरणी मिशन पॉसिबल फाऊंडेशनच्या पदमिनी पिटर स्टंप (वय-६६, रा. भवानी पेठ) यांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी केअरटेकर बिरु डोलारे (वय-४०, रा. आर एस इंटरप्रायझेसच्या शेजारी, झेड कॉर्नर, केशवनगर, मुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरु डोलारे याच्याकडे पूर्वी या कुत्र्याचा सांभाळ करण्याचे काम होते. त्यानंतर त्याच्या मालकाने एक नवीन कुत्रा आणला. तेव्हा केअर टेकर बिरूने जुन्या कुत्र्याला हाकलून दिले. मात्र तरीही हा इमानदार कुत्रा वारंवार त्याच्याकडे येत असे. पण, तो त्याला हाकलून देत असे. त्यामुळे या कुत्र्याने केअर टेकरच्या आई वडिलांना चावा घेतला. त्यावेळी केअर टेकरने या चॉकलेटी पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला खाण्यासाठी बोलावले.
इनामी कुत्रा काही त्याच्या मनातील ओळखू शकला नाही. त्याच्या दृष्टीने केअर टेकर हाच त्याचा मालक होता. आपल्या मालकाला उपरती झाली, असे या कुत्र्याला वाटले, तो त्या केअरटेकरच्या जवळ गेला.
दरम्यान, त्याने कुत्र्याच्या डोक्यावर लाकडी बांबुने मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले. त्याचे दोन्ही पाय दोरीने बांधले. आणि त्याला एका खड्ड्यामध्ये नेऊन टाकले. त्याच्या अंगावर प्लॅस्टिक, कागद, लाकडे तसेच पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्यात आले. हा कुत्रा बेघर झाला होता. त्यामुळे त्या परिसरातील महिला त्याला नियमित खायला देत होत्या.
कुत्रा नेहमीच्या ठिकाणाहून गायब झाल्याचे या महिलांच्या लक्षात येताच त्यांनी ते पदमिनी स्टंप यांना सांगितले. त्यांनी घटनास्थळी जाऊन परिसरात शोध घेतल्यानंतर त्यांना कुत्र्याचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत.