इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे) : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘हाफ आयर्न मॅन2024’ या क्रीडा स्पर्धेत सोरतापवाडी (ता. हवेली) येथील अतुल चौधरी यांनी अपूर्व कामगिरी करत ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला आहे. गोवा येथे नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या आहेत. या स्पर्धेत 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग व 21.1 किलोमीटर धावणे या तीन अत्यंत आव्हानात्मक टप्प्यांचा समावेश होता.
सिरम इन्स्टिट्यूटचे सदस्य असलेल्या अतुल चौधरी यांनी आपल्या कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही स्पर्धा पूर्ण केली आहे. या स्पर्धेत मार्गदर्शन निहाल बेग व सायनदेव कुलकर्णी या दोघांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक आणि मानसिक तयारी तसेच 7 तास 48 मिनिटांच्या कठीण वेळेत सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केले. स्पर्धेमधील प्रत्येक टप्पा हे एक स्वतंत्र आव्हान असूनही त्यांनी ते अत्यंत निपुणतेने पूर्ण केले.
दरम्यान, अतुल चौधरी यांच्या या ऐतिहासिक यशामुळे त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, तसेच सिरम इन्स्टिट्यूटमधील सहकारी व गावातील नागरिकांकडून कौतुक केले जात असून अभिमान व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेत यश मिळवणे हे केवळ एक वैयक्तिक विजय नसून, इतरांना प्रेरणा देणारे एक उदाहरण देखील आहे.
याबाबत बोलताना अतुल चौधरी म्हणाले, गोवा या ठिकाणी समुद्राच्या किनारी वर्षातून एकदाच या स्पर्धेचे आयोजन केले जाते. वातावरण दमट असल्याने काहींना हे वातावरण सुट होत नाही. यामुळे स्पर्धकांना या उष्णतेचा त्रास होतो. तसेच या स्पर्धेत 2 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकलिंग व 21.1 किलोमीटर धावणे या तीन अत्यंत आव्हानात्मक असल्याने या स्पर्धेत एकदा थकले तर स्पर्धेतून बाद केले जाते. त्यामुळे ही स्पर्धा आव्हानात्मक असते.