इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणावळा : पत्नी व मुलाचा कोयत्याने वार करून खून, तर मुलीचाहीखून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला वडगाव मावळ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी दिले आहेत. वसंत गोपाळ सातकर (वय-४७, रा. कान्हे, कामशेत, वडगाव मावळ) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रजनी वसंत सातकर व अनुष वसंत सातकर (वय-१३) असे खून झालेल्या मायलेकांची नावे आहेत. सदर घटना ही सन २०१७ ला घडली होती. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसंत सातकर याने किरकोळ कारणावरून १० जुलै २०१७ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पत्नी रजनी वसंत सातकर व मुलगा अनुष सातकर यांच्यावर कोयत्याने वार करून खून केला. तर आरोपीने मुलगी शुभ्रा हिच्यावरही वार केले. मात्र, शुभ्राच्या काकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यामुळे सुदैवाने शुभ्रा वाचली. त्यानंतर आरोपी हा घरातून बाहेर गेला. आणि जाता-जाता आरोपीने गणेश आंबेकर यालाही कोयत्याने वार करून जखमी केले. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.
सदर गुन्ह्याचा खटला हा वडगाव मावळ सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सुनील मोरे यांनी युक्तिवाद केले. सुनील मोरे यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी वसंत सातकर याला जन्मठेपेची कठोर शिक्षा, 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखीन 6 महिने शिक्षा, तसेच जखमी शुभ्रा सातकर व गणेश आंबेकर यांना जखमी केल्याप्रकरणी जन्मठेपेची कठोर शिक्षा व 5 हजार दंड व दंड न भरल्यास 6 महिने कारावास, तर जखमीचे घराचे नुकसान केल्याप्रकरणी 2 वर्षे साधी कैद, व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाची सर्व रक्कम जखमी साक्षीदार शुभ्रा सातकर हिला देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात न्यायालयाने १० साक्षीदार तपासले. तर सरकारी वकील सुनील मोरे यांना पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस निरीक्षक कुमार कदम, पोलीस हवालदार के. व्ही. नांगरे यांची विशेष मदत मिळाली.