इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सुमारे ४२ शेतकऱ्यांच्या नावावर कृषी हरित कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेचे कर्ज दाखवून स्वतःच्या खात्यात वळते करून ‘इंडियन ओव्हरसीज बँके’च्या इंदापूर तालुका शाखेत सुमारे आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी माजी आमदाराचा मुलगा आणि दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माजी संचालकासह बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक व व्यावसायिकाला सीबीआय एसीबी न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला आहे.
माजी संचालक अविनाश राजेंद्रकुमार घोलप (वय ५८, रा. घोलपवाडी, इंदापूर), बँकेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक लक्ष्मण रामचंद्र राठोड (वय ३९, रा. लिंगापूर, असिफाबाद) आणि व्यावसायिक हनुमंत गोरख साळुंखे (वय ४०, रा. करमाळा, सोलापूर) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
राठोडला दीड लाख रुपये, तर घोलप आणि साळुंखे यांना प्रत्येक ९५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला असून, तो न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेचे तत्कालीन वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक एस. के. श्रीवास्तव यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपींविरोधात दीड हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.