इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पळसदेव : राज्यात अनुकंपा तत्त्वावरील प्राथमिक शिक्षकनियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ३ वर्षात उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आल्यामुळे अनुकंपा तत्वावरील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या शासन निर्णयानुसार आता ३ ऐवजी ५ वर्षात पात्रता परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा ५ वर्षात उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) २३ ऑगस्ट २०१० च्या अधिसूचनेद्वारे पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करत शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केली होती.
त्यानुसार राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ आणि ६ मार्च २०१३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) किंवा TET अनिवार्य केली आहे. २० जानेवारी २०१६ च्या निर्णयानुसार अनुकंपा शिक्षण सेवकांना यामध्ये सूट देण्याचा निर्णय एनसीटीईच्या धोरणाशी विसंगत असल्याने या शिक्षकांनाही टीईटी कक्षेत आणले गेले आहे.
त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी टीईटी ही पात्रता परीक्षा पास होणे बंधनकारण करण्यात आले आहे. २०१६ च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळालेले, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी मिळालेले शिक्षक, तसेच अनुकंपा तत्त्वावर संस्थांनी नियुक्ती दिलेल्या शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता ३ ऐवजी ५ वर्षांची मुदत दिली आहे.