इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवड : सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असतानाच सोमवारी जेश्ठा गौरींचे आगमन झाले. आज मंगळवारी सर्वत्र गौरी पूजन मोठया उत्साहात साजरे करण्यात आले. सासवड येथे अनेक घरातून महिला आपल्या कल्पकतेतून गौरींपुढे वेगवेगळे विषय घेवुन देखावे सादर करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सगळ्याच थरातून कौतुक होत आहे.
सासवड येथील सोपान नगरातील साक्षी संदिप जगताप व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्तराखंड येथील केदारनाथ धाम मंदिरांची उभारणी देखाव्यात केली आहे. तर सासवडच्या डॉ. भाग्यश्री प्रशांत बोरावंके यांनी पुरंदर तालुक्यातील कऱ्हा नदीच्या संवर्धनाचा संदेश देणारा देखावा तयार केला आहे.
यात नदीकाठावरील सर्व मंदिरे दाखवण्यात आली असुन त्याद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे. कायम देखाव्याची परंपरा जपणाऱ्या दिपाली संतोष जगताप व त्यांचें चिरंजीव धवल जगताप यांनी वाहतुकीचे नियम व घ्यावयाची काळजी या विषयावर सुंदर प्रबोधन देखाव्याची मांडणी केली आहे.
संत सोपानदेव मंदिर परिसरात अश्विनी शिवरकर, सुनंदा शिवरकर, शारदा वाडकर, सुषमा रायकर, हेमांगी टिळेकर या महिलांनी संत तुकाराम महाराज व भक्ती विषयवार देखावा तयार केला आहे. सस्ते पार्क येथील दीपा सुहास कांबळे यांनी प्रगतशील शेतकरी देखावा तयार केला आहे. माजी नगर सेविका पुष्पा नंदकुमार जगताप व त्यांचा स्नुषा रेणूका व प्रियांका यांनी सुंदर फुलांची सजावट करून गौरी उत्सव साजरा केला आहे. सोपान नगर येथील मीरा मोरे (कुंजीर), माधुरी मोरे, गीता मोरे यांनी स्त्री शक्तीचा सन्मान हा सुंदर देखावा सादर केला आहे. दरवर्षी गौरींपुढे देखावे तयार करण्यावर महिलांचा भर वाढत असल्याचे दिसून येत आहे.