Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची सिमेंटच्या गट्टूने ठेचून हत्या; वाकड येथील घटना

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची सिमेंटच्या गट्टूने ठेचून हत्या; वाकड येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाकड : वाकड येथील काळेवाडी फाटा, धनगरबाबा मंदिराजवळील परिसरातून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने सोबत काम करणाऱ्या पेंटरचा सिमेंटच्या गट्टूने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अली अन्सारी (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रस्त्यावरील धनगरबाबा मंदिराजवळ घडली आहे.

या प्रकरणी वाकड पोलिसांनी अवघ्या बारा तासात बीड येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बाळु विठ्ठल साळवे (वय-32, रा. श्रीनगर कॉलनी, रहाटणी. मुळ रा. केसापुरी, माजलगाव, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रस्त्यावरील धनगरबाबा मंदिराजवळील परिसरात अंदाजे 35 वर्षे वयाचा पुरुष बेशुध्द अवस्थेत पडल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तेथील परिसरात चौकशी करून अली अन्सारी याची ओळख पटवली. तसेच, तो पेंटर असल्याचे पोलिसांना समजले.

दरम्यान, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. दोन्ही पथकांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरु घेण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष साक्षिदार, घटनास्थळ आणि आजुबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे अली अन्सारी याच्या सोबत काम करणारा बाळु साळवे याने हा खून केल्याचे उघड झाले आहे.

त्यानुसार, पोलिसांनी रहाटणी परिसर पिंजून काढत आरोपीचे घर शोधून काढले आहे. आरोपीच्या पत्नीकडे पोलिसांनी विचारपूस केली असता तिने आपला पती घरी आलाच नाही, असे सांगितले. मात्र, तांत्रिक माहितीच्या आधारे बाळू हा त्याच्या मुळ गावी गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील एका तपास पथकाने थेट बीड गाठले. मूळ गावातून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अली अन्सारी आणि आरोपी बाळु साळवे एक वर्षापासून सोबत पेंटिंगचे काम करत होते. त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. आरोपी बाळू यांची पत्नी आणि मृत अली अन्सारी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय बाळू याला आला होता. पत्नीवर संशय घेऊन त्याने सिमेंटच्या गट्टूने ठेचून अली यांचा खून केला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments