इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
आजच्या दिवशी अर्थात 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर चंद्रावर यशस्वीरित्या उतरवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्यानंतर भारत देश हा चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश बनला आहे. प्रज्ञान रोव्हरच्या साहाय्याने यशस्वी सॉफ्ट-लँडिंग करण्यात आले. या यशाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून घोषित केला. ही प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे आणि ती असायलाच हवी.
आपण या दैदिप्यमान यशातून खूप काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल केली पाहिजे. जर आपण अज्ञानात मग्न राहिलो तर जीवन निरर्थक होईल आणि ज्ञान मिळाले तर जीवन सार्थक होईल. अज्ञानातून पाळत आलेल्या अंधश्रद्धाचे निर्मूलन स्वतःपासूनच करायला सुरुवात केली तरच याचा अनुकूल परिणाम स्वतःच्या कुटुंबात तसेच समाजात होईल.
श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होऊ नये
श्रद्धा असावी पण तिचे रूपांतर अंधश्रद्धामध्ये होऊ नये. जर अजूनही आपण चंद्रग्रहण, सूर्यग्रहणसारख्या या खगोलीय घटनांकडे शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता ग्रहण काळात भ्रामक कल्पना डोक्यात घेऊन ग्रहण पाळत बसलो तर आपल्याला अजूनही या अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याची गरज आहे.
राष्ट्रीय अंतराळ दिवसाचे नेमके महत्त्व काय?
विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग करून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. भारत हा जगातील पहिला देश बनला जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर उतरला आहे. याशिवाय, भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये योगदान देण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामध्ये करिअर करण्यासाठी देशाच्या तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रीय अंतराळ दिवस सुरु करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.