इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : पुणे शहर हे वाहतूक कोंडीने त्रस्त असलेले देशातील एक शहर आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून ती उग्र रूप धारण करीत आहे. पुण्यातून 5 राष्ट्रीय महामार्ग, तर 10 पेक्षा अधिक राज्यमार्ग गेले आहेत. या 5 राष्ट्रीय महामार्गांपैकी पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीची अवस्था खूप बिकट झाली आहे. हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीत नागरिकांचा श्वास गुदमरला आहे. या महामार्गावरील वाहतूक कोंडीची कारणे पुणे प्राईम न्यूजने केलेल्या पंचानाम्यातून समोर आली आहेत. ती आज आपण जाणून घेणार आहोत.
अतिक्रमणे?
पुणे-सोलापूर महामार्गावरील अतिक्रमणे ही एक खूप मोठी गंभीर बाब आहे. मांजरी उपबाजारातील काही विक्रेते रस्त्यावरच भाजीपाला विक्री करतात. महामार्गावर बऱ्याच ठिकाणी गतीरोधक आहेत. तर काही ठिकाणी फूटपाथवर अतिक्रमणे आहेत. शेवाळवाडी पीएमटी बस थांब्याजवळ सेवा रस्त्यावरच अनधिकृत टपऱ्या बांधल्या आहेत. तर फुरसुंगी फाट्याजवळ सिग्नल आहे. मात्र, त्याठिकाणी वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्यासाठी उपलब्ध नसतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला टपरीचालक, फळेविक्रेते यांनी अतिक्रमणे केल्याने वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
अनधिकृत पार्किंग ?
हडपसर येथे महामार्गावरच बस व ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे आहेत. तसेच हडपसर गाडी तळ, पंधरा नंबर, लोणी स्टेशन, एमआयटी चौक, थेऊर फाटा, नायगाव चौक व उरुळी कांचन येथील तळवडी चौकात काही वाहनचालक महामार्गाच्या एका लेनवर चारचाकी गाड्या लावून तासनतास हॉटेलमध्ये बसत आहेत. त्यांना या वाहतूक कोंडीशी काहीही घेणे देणे नाही. या चौकात रस्त्यातच बेकायदा वाहतूक करणाऱ्या रिक्षा, मोठी वाहने, खासगी वाहने थांबतात. बेशिस्त वाहन चालक विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने गाडी चालवितात. अनधिकृत पार्किंगमुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीत अजून भर पडते.
अवजड वाहनांचा सूळसुळाट
पुणे, सोलापूर, लातूर, मराठवाडा, कर्नाटक या भागांना जोडण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहनांमध्ये कंटेनर, ट्रेलर, टँकर, बस आदी वाहने मोठ्या प्रमाणात धावतात. त्यातच प्रत्येक चौकात पीएमपीएल बस थांबा असल्याने या बसेस थांबण्यांसाठी मोठी जागा लागते. महामार्गावरील वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र, महामार्ग हा तेवढाच असल्याने नेहमी गजबजलेला असतो. त्यामुळे वाहतूक कोंडीत प्रचंड भर पडत आहे.
रिक्षा व सहा आसनी रिक्षांची वाढली संख्या..
महामार्गावर रिक्षाचालक व काही खाजगी वाहने घेऊन जाणारे चालक थेट महामार्गावरच गाड्या उभ्या करतात. या चालकांना पोलिसांचा वचक राहिला नसल्याने चालक थेट महामार्गावरच रिक्षा लावून निवांत फिरत आहेत. तसेच हडपसर, लोणी काळभोर, यवत, सासवड परिसरातून येणाऱ्या रिक्षांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे रिक्षांचे थांबे किती आहेत, एका थांब्यावर किती रिक्षा? याची माहिती जाहीर केली नसल्याने त्यावर सर्वस्वी रिक्षा चालकच अधिकार गाजवितात.
15 वर्षांपासून सहा पदरीकरण रखडले
गेल्या 15 वर्षांपासून पुणे-सोलापूर महामार्गाचे सहापदरीकरण होणार, असे सांगितले जाते. परंतु, या मार्गाचे काम काही होताना दिसत नाही. काही नेत्यांनी, मंत्र्यांनी आश्वासने दिली, तरीही या महामार्गाचे काम काही सुरू होत नाही, हे वास्तव आहे. सहा पदरीकरणाच्या अभावामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
दरम्यान, पुणे शहरात वाहतूक कोंडीमुळे प्रवास करण्यात बराच वेळ जातो, आर्थिक प्रगती मंदावते, रस्त्यावरील किरकोळ भांडण वाढतात, वाहन चालकांची चिडचिड वाढते, वाहनांचे इंधन मोठ्या प्रमाणावर जळते. तसेच ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढते. शहरात दरवर्षी सुमारे २५० लोक रस्ते अपघातात मरण पावतात, तर ८०० पेक्षा अधिक लोकांना गंभीर इजा होते. मात्र, प्रशासानाकडून उपाययोजनेच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचविले जाते. त्यामुळे पुणे शहरात नव्याने नेमणूक होणाऱ्या पोलिस आयुक्तांना पत्रकारांकडून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी काय उपाययोजना कराल? असा प्रश्न हमखास विचारला जातो. पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्यांचा पुणे प्राईम न्यूजने केलेल्या या पंचानाम्यानंतर कोणत्या उपाययोजना केल्या जातील? वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार का? हे पाहणेही आता महत्वाचे ठरणार आहे.