इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी, भोसरी आणि चिंचवड परिसरातील तीन रुग्णालयांमध्ये तसेच पुणे शहरातील दोन रुग्णालयांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल एका रुग्णालयाला प्राप्त झाला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. त्या मेलमध्ये दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकाने रुग्णालयांमध्ये जाऊन संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धन्वंतरी रुग्णालयाला रुग्णालयात बॉम्ब ठेवला असल्याचा मेल प्राप्त झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून निगडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण केले.
या पथकाने रुग्णालयाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. अस असताना भोसरी परिसरातील मेडिक्लोवर आणि चिंचवड येथील मोरया या रुग्णालयांना देखील अशाच प्रकारचा मेल प्राप्त झाला. त्यामुळे पोलिसांची चांगलीच पळापळ झाली.
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही रुग्णालयांमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र, तिथे देखील कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तीनही रुग्णालयांना आलेल्या मेलमध्ये एका दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले आहे. हे मेल कोणी आणि कशासाठी केले, याबाबत पोलिसांकडून तपास सुरु आहे.