इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते हॅक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत बोलताना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले कि, ग्रामीण पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे यांच्या समाजमाध्यमातील खाते हॅक करण्यात आले आहे. हा प्रकार रविवारी (दि. ११) उघडकीस आला होता. समाजमाध्यमातील खाते हॅक करून हॅकरने ४०० डॉलरची मागणी केली आहे.
याबाबतचा संदेश प्रसारित झाल्यानंतर सुळे यांच्या स्वीय सहायक महिलेने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत समाजमाध्यम चालक कंपनीशी संपर्क साधला असता सुळे यांच्या समाजमाध्यमातील खात्याचे नियंत्रण हॅकरकडून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सुप्रिया सुळे यांचे समाजमाध्यमातील खाते पूर्ववत झाले आहे. हॅकरने सुळे यांच्यासह आणखी कोणाचे खाते हॅक केले आहे का? यादृष्टीने पोलीस तपास करत आहे.
नेमकं प्रकरण काय?
खासदार सुप्रिया सुळे यांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक केल्यानंतर त्यांच्याकडून हॅकरने 400 डॉलरची मागणी केली होती. दरम्यान, याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, मी बराच वेळ माझ्या फोनवर व्यस्त होते. याचं कारण माझा फोन हॅक झाला. माझा फोन माझ्यासोबत इतर कोणीतरी ऑपरेट करत आहे. मी जेव्हा इथे आले तेव्हा माझ्या हे लक्षात आले. येथे आल्यावर माझं व्हॉट्सअॅप सुरुच होत नव्हतं. त्यामुळे मी जयंत पाटील यांना नमस्कार मेसेज करा असे सांगितले. त्यांनी तो मेसेज केल्यानंतर मी फोनवर काहीही न करता त्यांना समोरुन नमस्कार असा मेसेज आला. या प्रकारानंतर मी माझा फोन बंद केला, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.