इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहर पोलीस दलाच्या 30 पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदेवाल्यांकडून ‘कलेक्शन’ करणाऱ्या 70 ‘कलेक्टरांची’ उजळणीचे धडे गीराविल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदली केली आहे. मात्र वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याऐवजी भररस्त्यात शिरून गाड्या अडवितात. कारवाईची भीती दाखवून मोठी माया गोळा करीत आहेत. वाहतूक विभागातील ‘कलेक्टरांच्या’ या पठाणी वसुलीला सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पुणे शहर वाहतूक विभागातील ‘कलेक्टरांची’ बदली कधी होणार ? अशी चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे.
पुणे-सोलापूर, पुणे-नगर, पुणे-सातारा, पुणे मुंबई, पुणे-नाशिक हे 5 महत्वाचे महामार्ग पुणे शहरातून जात आहेत. या महामार्गासह, छोटे-मोठे राज्यमार्ग व शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याचे पुणे शहर वाहतूक पोलिसांचे कर्त्यव्य आहे. वाहतूक पोलिसांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून वाहतूक नियमन केले तर वाहतूक कोंडी होणार नाही. मात्र काही वाहतूक पोलीस नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहत नसल्याने, चौकाचौकात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. तर हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच वाहतूक पोलीस कर्मचारी आपले कर्त्यव्य व जबाबदारी काटेकोरपणे पार पाडत आहेत.
वाहतूक पोलिस काही ठिकाणी आडबाजूला छुप्या पद्धतीने उभे राहतात. चार-पाच जण एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते. त्यावेळी पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशांची मागणी केली जाते. व तडजोडीअंती काही रक्कम घेऊन त्यांना सोडून दिले जाते. असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आदेशाला काही वाहतूक पोलिसांनी केराची टोपी दाखवील्याचे दिसून येत आहे.
वाहन चालकांकडून पैसे घेणारे पोलिस शोधण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. हे पोलिस साध्या वेशामध्ये वाहनचालक म्हणून शहराच्या विविध भागांत फिरणार होते. पोलिस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशांची मागणी करतात का?, याची या पथकाकडून पाहणी केली जाणार होती. तसेच कोणताही गैरप्रकार आढळून आला तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार. अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती. मात्र आजपर्यत पथकाने कोणतेही स्टिंग ऑपरेशन न करता पथक आलेच नसल्याची माहिती मिळत आहेत.
वाहतूक विभागातील ‘कलेक्टरांनी’ बदली कधी?
एकीकडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु ठेऊन मोठी रक्कम गोळा करणाऱ्या 70 ‘कलेक्टरांची’ बदली केली आहे. तर दुसरीकडे वाहतूक नियमन करण्याऐवजी काही वाहतूक पोलीस वाहनचालकांना अडवून पठाणी वसुली करीत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागातील ‘कलेक्टरांच्या’ बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार कधी देणार? की वाहतूक विभागातील पोलिसांना सुट दिलीय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.