इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
खेड : महाराष्ट्र राज्य स्तरीय योजना दुधाळ गाई/ म्हशीचे वाटप या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ७ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये लाच स्वीकारताना खेड तालुक्यातील कुडे बुद्रूक येथील पशुधन पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. बंडू बबन देवकर (वय-४३, पद पशुधन पर्यवेक्षक, कुडे बुद्रुक, ता. खेड, जि, पुणे) असे पशुधन पर्यवेक्षकाचे नाव आहे. ही कारवाई ६ ऑगस्ट रोजी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक येथील पशु वैद्यकीय रुग्णालय केली. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी महाराष्ट्र राज्य स्तरीय योजना दुधाळ गाई/ म्हशीचे वाटप या योजनेचा लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज सादर केला होता. लोकसेवक बंडू देवकर यांनी तक्रारदार यांना नमूद योजनेच्या अंतिम यादीमध्ये लाभार्थी म्हणून नाव घालून देतो. त्याकरीता देवकर यानी तक्रारदार यांचेकडे ७ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या प्रकरणाची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे केली.
या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक बंडू देवकर यांनी दुधाळ गाई/ म्हशीचे वाटप या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचासमक्ष ७ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, लोकसेवक बंडू देवकर यांनी तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
त्यांचेविरुद्ध खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलीस निरीक्षक रुपेश जाधव पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.