इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती : बारामती तालुक्यातील गुणवडी येथील एका तरुणाचा गेल्या वर्षी ३० जून रोजी खेड तालुक्यातील आळंदी येथे विवाह सोहळा पार पडला. लग्नानंतर नव्या नवरीला घेऊन ते घरी आले. मात्र, नवरीने त्याच दिवशी नवरदेवाच्या आईकडील सोन्याचे गंठण घेत घरातून धूम ठोकली. याप्रकरणी तरुणाने पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. अखेर त्याने न्यायालयात धाव घेतली. वर्षभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सचिन दत्तात्रय शिरसट याने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गीता संभाजी जाधव (रा. आहेर, धानोरा, जि. बीड), संतोष एकनाथ साळुंखे (रा. गुणवडी, ता. बारामती), महेश बापू चोबे (रा. मळद, ता. बारामती), सुनीता अग्रवाल (रा. किनवट, जि. नांदेड), धोंडीराम सूर्यभान फुले (रा. सोनारी, परांडा, जि. धाराशिव), रामभाऊ बर्चे (रा. बार्शी, जि. सोलापूर), पूजा कचरू निलपत्रवार (रा. धानोटा. जि. बीड) व जिजाबाई संभाजी जाधव (रा. आहेर, जि. बीड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादीचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. संतोष साळुंखे यांच्या केश कर्तनालयात त्याचे येणे-जाणे होते. त्याचे लग्न करायच आहे, हे साळुंखे याला माहित होते. त्याने महेश चोबे याच्याशी त्याची ओळख करून दिली. या दोघांनी सुनीता आग्रवालला फोन करून फिर्यादीचे बोलणे करून दिले, तसेच लग्नासाठी चार लाख रुपये देण्याचे ठरले.
मुलीचा फोटो व्हॉटसअॅपवर पाठविण्यात आला. आबाल, फुले व बर्चे यांनी मुलीला घेऊन आळंदी येथे लग्र करून देण्याची तयारी केली. त्यानुसार साळुंखे व चोबे यांना सोबत घेत ३० जून २०२३ रोजी फिर्यादी हे आळंदीत आले. तेथे मुलीकडून अन्य लोक आले होते, जिजाबाई मुलीची आई व पूजा मुलीची बहीण तेथे उपस्थित होते. एका सेवाभावी संस्था संचलित हॉलमध्ये लग्न पार पडले. साळुंखे, चोबे, अग्रवाल, फुले व बर्चे यांनी फिर्यादीकडून ४ लाख रुपये घेतले. फिर्यादीने ५० हजार रुपये किमतीचे दागिने पत्नीच्या अंगावर घातले. रीतसर लग्न लावले.
लग्नानंतर फिर्यादी पत्नीला घेऊन घरी आले. रात्री जेवण झाल्यांनंतर पत्नी लघुशंकेचा बहाणा करून फिर्यादीच्या आईचे गंठण घेऊन पसार झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत तक्रार दिली. मात्र, त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही. पुढे त्याने शहर उपविभागीय पोलिस अधिकारी, अप्पर पोलिस अधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली. मात्र, त्यावरही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्याने न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर वर्षभराने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.