इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह करून पत्नीला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटी व शर्थीवर जामीन मंजूर केला आहे. हे आदेश न्यायाधीश एस. आर. नरवडे यांनी दिले आहेत.
तुकाराम नारायण पांचाळ (वय-25, नन्हे, पुणे) असे जामीन मंजूर झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका विवाहितेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सदर घटना ही नन्हे परिसरात जानेवारी 2024 ते 9 मे 2024 या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता आणि आरोपी तुकाराम पांचाळ हे दोघेजण एकाच ठिकाणी काम करीत होते. आरोपीने प्रेम असल्याचे सांगून पिडीता यांना लग्नाची मागणी केली. त्यावेळी पिडीता यांनी जात वेगळी असल्याने नकार दिला होता. मात्र आरोपी तुकाराम पांचाळ याने लग्नाचा तगादा लावला. त्यानंतर दोघांचे लग्न ताडीवाला रोड परिसरातील बौद्ध विहारात झाले.
दरम्यान, विवाहाच्या काही दिवसानंतर पतीने पिडीतेला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या मारहाणीत पिडीतेने दोनदा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला आहे. त्यानंतर आरोपी पांचाळ याने पिडीतेच्या खात्यातून वेळोवेळी 90 हजार रुपये काढून घेतले. तसेच आरोपीने सोन्याची अंगठी व मंगळसूत्रही हिसकावून घेतले.
याप्रकरणी पिडीतेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी तुकाराम पांचाळ याच्यावर अॅट्रॉसिटीसह (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी तुकाराम पांचाळ याला अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा खटला हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. याखटल्यात आरोपीने अॅड. स्वप्नील पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या खटल्यात स्वप्नील पाटील यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यासह काही अटी व शर्थीवर जामीन मंजूर केलाआहे. हे आदेश न्यायाधीश एस. आर. नरवडे यांनी दिले आहेत.
दरम्यान, या खटल्यात अॅड. स्वप्नील पाटील यांना अॅड. परमेश्वर काकडे, अॅड. योगेश काकडे, अॅड. मयुर मराठे आणि विनय वजरीनकर यांची विशेष मदत मिळाली.