इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबईः मुंबईत २००६ साली झालेल्या लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने धक्कादायक निकाल दिला आहे. दोषी ठरवलेल्या सर्व आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती अनिल किल्लोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत. आरोपींना शिक्षा देण्यासाठी पुरेसे आणि विश्वासार्ह पुरावे समोर आले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. सत्र न्यायालयाने यापूर्वी ५ जणांना फाशीची शिक्षा तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, ज्याला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, राज्य सरकारकडे या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे.
२०१५ मध्ये मोक्का (MCOCA) कोर्टाने या प्रकरणी पहिला निकाल दिला होता, त्यानंतर आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मागील काही महिन्यांपासून उच्च न्यायालयात यावर सलग सुनावणी सुरू होती. बॉम्ब, बंदुका किंवा नकाशांशी संबंधित पुरावे जुळून आले नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. सत्र न्यायालयात १२ आरोपींना दोषी ठरवण्यासाठी योग्य असलेले पुरावे उच्च न्यायालयात टिकले नसल्याने दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) तपासाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
२०१५ साली विशेष न्यायालयाने या प्रकरणातील १२ आरोपींना दोषी ठरवले होते. दरम्यान, पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबाब नोंदवले, असा आरोप या दोषींनी उच्च न्यायालयात केला होता.
२००६ साली ७ जुलै रोजी सायंकाळच्या वेळी मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी केवळ देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. या भीषण घटनेत १८९ निष्पाप लोक ठार झाले होते. तर ७०० हन अधिक नागरिक जखमी झाले होते.