इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ११ लाख २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दीपाली प्रसाद गुरव (वय ३४ वर्ष, रा. सद्गुरुकृपा बिल्डिंग, रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.
काय आहे घटना ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली गुरव यांचे वडील आजारी असून सध्या त्यांच्यावर डेक्कन जिमखाना भागातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या आपले घर बंद करून रुग्णालयात गेल्या होत्या.
सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर त्यांना घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसून आले. घरात पाहणी केली असता, बेडरूममधील कपाट उचकटून सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध सुरू आहे.