इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शेअर बाजारात आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी चतुःशृंगी परिसरातील एका तरुणाची तब्बल 44 लाख 81 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. फेब्रुवारी महिन्यात या तरुणाच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत एक संदेश आला. संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने तरुणाला ‘चांगला परतावा मिळवून देतो’ असे सांगत आकर्षक योजनांची माहिती दिली. तरुणाने गुंतवणूक केल्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणात परतावा मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुमारे 44 लाख 81 हजार रुपये संबंधित आरोपींच्या बँक खात्यांमध्ये जमा केले. मात्र, त्यानंतर त्याला परतावा मिळाला नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तरुणाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिस निरीक्षक अश्विनी ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, सायबर चोरट्यांकडून अशा प्रकारे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू असून, सायबर पोलिसांकडून वेळोवेळी सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.