इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः लोकसभा निवडणुकीवेळी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ आणि ‘तुतारी’ या दोन्ही चिन्हांच्या साधर्म्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला बसला. त्यामुळे या पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह यादीतून वगळले. त्याच धर्तीवर सहकारी संस्थांच्या निवडणूक चिन्हांच्या यादीतून तुतारी’ हे चिन्ह वगळले आहे. याबाबतचे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी प्रसृत केले.
महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ च्या नियमांतील तरतुदींनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांना द्यावयाच्या निवडणूक चिन्हांबाबत विविध परिपत्रके प्राधिकरणाने यापूर्वीच प्रसृत केली आहेत. त्यातील नियमानुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी संबंधित निशाणी, चिन्हे हे सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना देता येत नाहीत. त्यानुसार यापूर्वी वगळलेल्या चिन्हांचा वापर करू नये, असे प्राधिकरणाने २८ नोव्हेंबर २०२२ रोजी आदेशीत केले आहे. तरी देखील १० ऑक्टोबर आणि ३१ डिसेंबर २०१४ च्या परिपत्रकाद्वारे सूचित केलेली चिन्हे, निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिलेली चिन्हे यामध्ये काही ठिकाणी साधर्म्य असल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनास आल्यामुळे अशा ठिकाणी प्राधिकरणास चिन्हाच्या नावामध्ये सुधारणा करून काही चिन्हे वगळणे आवश्यक झाले आहे. आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘तुतारी’ हे चिन्ह वापरता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.