इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
केडगाव : या सरकारच्या काळात 67,381 महिलांवर अत्याचार झाले. तसेच एका तासामध्ये पाच अत्याचाराच्या तक्रारी येतात तसेच 64 हजार महिला बेपत्ता झाल्या असून त्यांचा कसलाच तपास लागत नाहीये. त्यामुळे 64 हजार संसार आज मोडले आहेत. त्यामुळे या सरकारला लाडकी बहीण म्हणण्याचा सुद्धा अधिकार उरला नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले
दौंड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ (दि.17) वरवंड (ता दौंड) येथे आयोजित सांगता सभेत शरद पवार बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, भूषण सिंह होळकर, जगन्नाथ शेवाळे, आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, सोहेल खान, बादशाहभाई शेख, बाळासाहेब कापरे, विलास लवांडे, दिग्विजय जेधे, दिलीप हंडाळ, योगिनी दिवेकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, तरुणांनी, आया बहिणींनी आता ठरवले आहे की रमेश थोरात यांना निवडून द्यायचे कारण रमेश थोरात यांनी सहकारामध्ये उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी जनतेच्या विकासासाठी वाहून घेतले. मागील काळात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. तिच्या हिताची जपणूक केली, यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.
एकेकाळी यांच्या काळात साखर कारखाना चांगला चालला होता. उसाचे क्षेत्र ही होते पण कारखाना चुकीच्या माणसाच्या हातात गेला ज्यांनी कारखान्याचे वाटोळे केले. आमचे संसार उद्ध्वस्त केले. त्यामुळे जी लोक संसार उद्धस्त करतात त्याला जनता माफ करणार नाही. दौंड तालुक्यातील लोकांचा उत्साह पाहून दौंड चे चित्र स्पष्ट आहे. या तालुक्याच्या प्रश्नाचा अभ्यास असणारे थोरात यांना बहुमताने विजयी करा.
या प्रसंगी भूषण राज होळकर म्हणाले की, भाजपने जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम केले. येथील कारखान्याच्या कामगारांना भर दिवाळी उपोषणाला बसण्याची वेळ आली. तसेच येथील आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागे पुढे मागे पुढे करतात. पण मागेपुढे करून दौंड चा विकास काही झाला नाही.
रमेश थोरात म्हणाले, मी पन्नास वर्षे राजकारणात विविध पदावर काम केले. ज्या पदावर काम केले तिथे उत्कृष्ट काम केले आहे. आमदार असताना तालुक्यात भरभरुन कामे केली. मला कुठलीही स्वतःसाठी हवेली बांधायची नाही, मला जनतेची सेवा करायची आहे.