इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून एका 65 वर्षीय व्यक्तीने आपल्या 80 वर्षीय आईवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश पांडुरंग साप्ते (वय 65, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे आरोपीचे नाव आहे, तर कुसुम साप्ते (वय 80) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अविनाश यांचा भाचा आशिष अशोक समेळ (वय 45) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संपत्तीच्या वाटणीवरून अविनाश आणि त्यांच्या आईमध्ये बराच काळ वाद सुरू होता. शनिवारी रात्री सुमारे 10 वाजता अविनाश दारूच्या नशेत घरी आला आणि आईशी वाद घालत त्याने तिच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चाकूने वार केले. यात कुसुम गंभीर जखमी झाल्या. आजीला वाचवण्यासाठी आशिष यांनी मध्यस्थी केली असता, आरोपीने त्यांच्या हातावरही चाकूने वार केले.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अविनाशला अटक केली. सध्या जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश कारके करत आहेत.