इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
न्हावरे (शिरूर): शिरूर तालुक्यामध्ये आंबळे परिसरातील सोनखिळावस्ती येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उचकटून जबरदस्तीने आत प्रवेश केला आणि शेतकरी दाम्पत्याच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६७हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे चोरट्यांनी शेतकरी दाम्पत्याला मारहाण करत दागिने हिसकावून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रमेश ज्ञानदेव फुलपगर (वय ५४, रा. आंबळे सोनखिळावस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता.०५) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरांनी रमेश फुलपगर यांच्या राहत्या घराचा बंद दरवाजा कोणत्या तरी लोखंडी हत्याराच्या सहाय्याने ठोकून दरवाजाची कडी ढीली केली. नंतर कडी उचकटून घरात प्रवेश केला. यावेळी चोरांनी तोंडावर रूमाल बांधले होते. तसेच त्यांच्या हातात लाकडी काठ्या व सुरे होते. घरात घुसताच चोरांनी फुलपगर यांच्या पायावर काठीने मारहाण केली. त्यांच्या पत्नी ललिता फुलपगर यांच्या गळ्यातील, कानातील व पायातील सोन्याचांदीचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. तसेच कपाटातील २५ हजार रुपये रोख आणि दागिने मिळून एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करत आहेत.