इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत बँक पूर्णपणे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन अग्निशमक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली असून मोठी दुर्घटना टळली आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यामुळे बँकेचे मुख्य लॉकर सुरक्षित
शिक्रापूर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसमोरुन महिला पोलीस हवालदार किरण निकम या पहाटेच्या सुमारास मोर्निंग वॉकसाठी जात होत्या. त्यावेळी त्यांना बँकेच्या आतमधून धुराचे लोळ येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनसह अग्निशमक दलाला माहिती दिली. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, किरण निकम, ललित चक्रनारायण, बँकेचे व्यवस्थापक अमोल नफाडे, ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ यांसह आदींनी स्थानीक नागरिकांच्या मदतीने आग विजावण्याचा प्रयत्न केला.
काही वेळाने पुणे महानगर विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील दोन अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रांजणगाव औद्योगिक वसाहतचे उपअग्निशमन अधिकारी महेंद्र माळी, अशोक हातवटे, अमोल गायकवाड, सचिन शेंडगे, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अल्ताब पटेल, लक्ष्मण मिसाळ, प्रशांत अडसूळ, महेश पाटील, संकेत कुंभार, कृष्णा नांगरे यांसह आदींनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली.
मात्र, आगीमध्ये बँकेचे सर्व साहित्य, कागदपत्रे, कॉम्प्युटर, फर्निचर जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु बँकेचे मुख्य लॉकर सुरक्षित असल्याचे दिसून आले. आग नेमकी कशाने लागली याबाबत काही समजू शकले नाही. तर ऐन वर्दळीच्या ठिकाणी व मनुष्यवस्ती मध्ये असलेल्या बँकेला लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली आहे.