इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
भिगवणः भिगवण जवळील मदनवाडी येथील भिगवण-बारामतीमार्गालगत असणाऱ्या एका लॉजमध्ये बेकायदा सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा मारून एका तरुणीची सुटका केली तर लॉजमालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजमालक शिवाजी विजय देवकाते (रा. मदनवाडी, देवकातेवस्ती, ता. इंदापुर, जि. पुणे) याच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार आप्पाजी सोपान दराडे, (नेमणुक प्रतिनियुक्ती उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, बारामती उपविभाग, पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मदनवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतून जाणाऱ्या भिगवण-बारामती मार्गलगत असणाऱ्या हॉटेल आर्यन लॉजमध्ये बेकायदा वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बारामती उपविभागीय कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (दि.12) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लॉजवर छापा टाकला असता यात महिलांकडून बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. या छाप्यात एका 33 वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली आहे. ती सध्या च-होली खुर्द (पुणे) येथे राहत असून मुळगाव उत्तरप्रदेश जिल्ह्यातील जयंतीपुर (जि.चोबीस परभुना) येथील रहिवाशी आहे. बारामती विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहेत.