इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पानशेत : मढेघाट (ता. वेल्हे) तसेच इतर पर्यटनस्थळी हजारो पर्यटक वर्षभर भेटी देत असतात. पर्यटक, स्थानिक नागरिक यांची तालुक्यात वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची उल्लेखनीय कामगिरी होत आहे असे वेल्हेचे तहसीलदार निवास ढाणे तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांनी सांगितले.
हिवाळा, उन्हाळा ऋतुमध्ये तसेच बहुतांश वेळा पावसाळ्यात डोंगराची दरड कोसळणे व रस्ते बंद होणे, रस्ते अपघात, वृक्ष कोसळणे, विजवहनाच्या तारा, पोल, शॉर्टसर्किट यातून होणारे अपघात, किल्ले परिसरात पर्यटक जखमी होणे, खोल दरीमध्ये पडून जीवित हानी होणे, धरणाच्या पाण्यात बुडून होणारे अपघात, ओढे नाले तसेच नद्यांना येणारे पुर व इतर अनेक आपत्ती ओढवण्याची शक्यता निर्माण होत असते. या आपत्तींच्या काळात आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले व श्रीप्रसाद चोंडे यांसह सर्व सहकारी याची दखल घेत आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार राजगड (वेल्हे) तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व शासकीय यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज राहून आपत्ती निवारण करत असल्याचे प्रांताधिकारी महेश हरिश्चंद्रे यांनी सांगितले.