इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या असून, यंदाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जून ते 18 जुलैदरम्यान मुंबईत चालणार आहे.
यंदाच्या पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील. यावेळी राज्यातील सर्वात चर्चेत असणारा मुद्दा हिंदी भाषेची सक्ती अधिवेशनात उचलला जाईल. सोबतच शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकरी कर्जमाफी यावरून देखील सरकारला घेरले जाईल. या सगळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारचे मंत्री कशाप्रकारे सामोरे जातात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 29 जूनला प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला विरोधक हजेरी लावणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कारण विरोधकांकडून नेहमीच या चहापानावर बहिष्कार टाकला जातो.
विधिमंडळ अधिवेशन हे राज्यातील विविध समस्या आणि मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याची चांगली संधी असते. विरोधकांच्या या प्रश्नांना सरकाराला तोंड द्यावे लागते. तसेच सर्वांसमोर अधिकृतरित्या भूमिका मांडावी लागते. म्हणूनच विधिमंडळ अधिवेशन हे महत्वाचे असते.