इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
रांजणगावः शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती औद्योगिकवसाहतीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका चाळीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्याच चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही, तर या घृणास्पद कृत्याबद्दल कोणाला सांगितल्यास पत्नी आणि मुलीला जीवे मारण्याची धमकीही नराधम पित्याने दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूरहून कामासाठी आलेले हे कुटुंब रांजणगाव औद्योगिक परिसरात वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची आई कामासाठी बाहेर गेली असताना, घरी एकट्या असलेल्या मुलीवर या विकृत बापाने अत्याचार केला.
भीतीपोटी मुलीने सुरुवातीला ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. मात्र, पोटात साठवलेला हा आक्रोश अखेर तिने आपल्या आईजवळ व्यक्त केला. आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचे सत्य ऐकून आई हादरून गेली. आईने धाडस करत रांजणगाव पोलिस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
रांजणगाव पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत नराधम पित्याला अटक केली आहे. त्याला शिरूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.