इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
वाघोलीः ही घटना पुण्याच्या वाघोली भागात घडली असून, एका बंद सदनिकेतून तब्बल सात लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. विशेष म्हणजे चोरट्याने दरवाज्याजवळ ठेवलेली चावी वापरून घरात प्रवेश केला असून, त्यामुळे हा चोरटा घरातील माहिती असलेला व्यक्ती असण्याची शक्यता पोलीस तपासात व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत संबंधित महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या वाघोली येथील काळूबाईनगर परिसरातील अश्विनी रेसिडन्सी सोसायटीत वास्तव्यास आहेत. १७ जून रोजी दुपारी त्या काही कामानिमित्ताने घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. घरातून बाहेर पडताना त्यांनी नेहमीप्रमाणे दरवाज्याजवळ ठराविक जागी सदनिकेची चावी ठेवली होती. ही जागा फक्त त्यांच्या कुटुंबीयांनाच माहित होती.
त्यानंतर अनोळखी चोरट्याने ही चावी उचलून घराचे कुलूप उघडले आणि थेट शयनगृहातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सात लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. महिलेने संध्याकाळी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक बागल करत आहेत.
दरम्यान, दरवाज्याजवळ, कुंडीत, सापटीत किंवा पादत्राणे ठेवण्याच्या रॅकमध्ये चावी ठेवण्याची सवय अनेकांना असते. ही माहिती कुटुंबीयांनाच असते, मात्र सार्वजनिक ठिकाणी चावी ठेवण्याची ही पद्धत चोरट्यांसाठी संधी निर्माण करत असल्याचे याआधीही दिसून आले आहे. कोथरूड व मार्केट यार्ड परिसरातही यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडल्या असून, त्यामुळे नागरिकांनी अशा सवयींपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.