इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे शहरात नुकत्याच गांजा तस्करांवर झालेल्या कारवाईमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तब्बल 5 किलो गांजा जप्त केलेल्या या प्रकरणात, स्वारगेट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदे याचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस कर्मचारी हा केवळ संरक्षण देणेच नाही तर तो गांजाच्या अवैध व्यवसायात भागीदार होता, असेही प्राथमिक तपासातून समोर आले आहे.
या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे, त्यांनी तत्काळ NDPS कायद्यांतर्गत पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
सहकार नगर पोलीस ठाण्याने काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवून एका कारवाईत 5 किलो गांजा जप्त केला होता. या कारवाईनंतर सुरू असलेल्या सखोल तपासात पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. कॉल रेकॉर्डस, आर्थिक व्यवहारांचे पुरावे आणि स्थानिक माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनंतर या प्रकरणात पोलीस कर्मचारी नवनाथ शिंदेचे नाव समोर आले.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस आयुक्तांनी कठोर भूमिका स्पष्ट केली. “गुन्हेगारी कृत्यांमध्ये कोणताही पोलीस कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, प्रशासनाने या प्रकरणात तत्काळ कठोर भूमिका घेत, यापुढेही अशा गैरकृत्यांना थारा दिला जाणार नाही, र नाही, हे दाखवून दिले आहे. नवनाथ शिंदेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुढील तपास सुरू झाला आहे. या प्रकरणात आणखी कोण सामील आहे, याचाही शोध पोलीस घेत आहेत.