इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे गणेशोत्सवाच्या काळात भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. मंगळवारी (2 सप्टेंबर) दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास घरात घुसून चोरट्यांनी 1 लाख 40 हजार रुपये रोख आणि सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अरुण अर्जुन भुजबळ (वय 41, व्यवसाय शेती, रा. वरकुटे बुद्रुक, भुजबळवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, घटनेच्या दिवशी फिर्यादी यांची पत्नी कोमल, आई सिंधू, बहिण विशाखा व भाचा अविष्कार हे सर्वजण कामानिमित्त इंदापूर शहरात गेले होते. घरी केवळ फिर्यादींच्या आजी सुभद्रा विठ्ठल मोहिते या उपस्थित होत्या.
घराच्या मुख्य दरवाजाला शटर लावून, मागील दरवाजाला फक्त कडी लावण्यात आली होती. याचा गैरफायदा घेत तीन अज्ञात व्यक्तींनी मागच्या बाजूने घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील लाकडी आणि लोखंडी कपाटे तोडून त्यातील गळ्यातील गंठण, डायमंड सेट, कानातील टॉप्स असे अंदाजे 9 तोळे सोन्याचे दागिने आणि 1 लाख 40 हजारांची रोख रक्कम चोरून नेली.
घटनेनंतर पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरादार तपास करीत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.