Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा हवी; नागरिकांची मागणी

लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा हवी; नागरिकांची मागणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे): लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत शहरीकरण, नागरीकरण व औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी आपत्ती आणि आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशा घटना घडल्यास ग्रामीण भागापासून लांब अंतरावर असलेल्या हडपसर आणि वाघोली येथील अग्निशमन दलाला पाचारण करावे लागत आहे. येथून पाण्याचे बंब येईपर्यंत आगीत मोठे नुकसान होत आहे. यासाठी भविष्यातील एखादी मोठी घटना टाळण्यासाठी ग्रामीण भागासाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा हवी, अशी मागणी नागरिक आणि उद्योजकांकडून होत आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन या भागात झालेल्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. शहराचा झपाट्याने विकास होत आहे. या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या, शैक्षणिक संकुले, बाजारपेठा व अनेक प्रकारचे व्यवसाय वृद्धिंगत होत आहेत. शिवाय येथून परप्रांतीय व आंतरजिल्ह्यातून येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे.

आठच दिवसांपूर्वी कदमवाकवस्ती येथील संभाजी नगर परिसरातील एका वसाहतीतील सदनिकेला आग लागली होती. पुणे-सोलापूर महामार्गावर वारंवार छोट्यामोठ्या आग लागल्याच्या घटना घडतच असतात. मात्र, या आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण होते. यावेळी अग्निशामक दलाला हडपसर किंवा वाघोली येथून पाचारण करावे लागते. ते घटनास्थळी पोहचेपर्यंत बराच वेळ झालेला असतो. अशा वेळेस ती आग आटोक्यात येत नाही.

पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन अशी मोठी व झपाट्याने विकसित होणारी गावे असून येथे वारंवार आगीच्या घटना घडतात. यासाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. मात्र, पुणे-सोलापूर महामार्गावरील एकाही गावात याचे नियोजन करण्यात आलेले नाही. बऱ्याचदा लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी वाघोली व हडपसर पालिकेचा बंब बोलवावा लागतो. तोपर्यंत संबंधित दुकानदार मालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोर जावे लागते.

दरम्यान, शहरात यापूर्वी अनेकदा शॉर्टसर्किट व अन्य कारणांनी दुकानांना आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत आणि त्यावेळी नागरिकांबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींना अग्निशमन बंबाची आवश्यकता किती आहे, याचा प्रत्यय आला होता. म्हणूनच अग्निशमन बंबाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शहरातील नागरिक, व्यापारी यांच्यातून केली जात आहे.

वाढत्या नागरिकरणामुळे आगामी काळात अशा घटना वाढण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याचा विचार करून लवकरात लवकर अग्निशामक दलाची निर्मिती करावी. लोणी काळभोर, कुंजीरवाडी, व उरुळी कांचन येथे अग्निशामक केंद्र उभारण्यात आले, तर नागरिकांना तात्काळ मदत पोहचून आग आटोक्यात येऊ शकते. त्यामुळे होणारी जीवितहानी व स्थावर मालमत्तेची हानी रोखता येऊ शकेल.

हरिष गोठे, सरपंच, (कुंजीरवाडी, ता. हवेली)

लोणी काळभोर येथील एचपी कंपनीला अग्निशमन दलाची गाडी आहे. मात्र, ती फक्त त्यांच्या कंपनीपुरती मर्यादित ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा कोणताही फायदा मिळत नाही. त्यामुळे एचपी कंपनीला अग्निशमन दलाची गाडी असून नसल्यासारखी म्हणणे वावगे ठरणार नाही.

अविनाश बडदे, ग्रामपंचायत सदस्य, (कदमवाकवस्ती, ता. हवेली)

अग्निशामक दल सदर ठिकाणी येईपर्यंत लोकांमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. अशा घटना घडल्यानंतर कोणाशी संपर्क करायचा हे लक्षात येत नाही. ज्या सुविधा आहेत त्या हडपसर व वाघोली या ठिकाणी आहेत. पण नक्की कोणाशी संपर्क साधायचे हे प्राथमिक स्तरांवर लोकांच्या लक्षात येत नाही.

विकास धुमाळ, शिक्षक, (कुंजीरवाडी, ता. हवेली)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments