इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणावळाः पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील बोरघाटात शनिवारीसायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. ट्रकमधून नेले जाणारे लोखंडी पाईप अचानक खाली पडून दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातात ऋतुजा चव्हाण (वय २६) आणि अंकिता शिंदे (वय २८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या अपघातात स्कूटरस्वार वैभव गलांडे (वय २९), लता शिंदे (वय ५०) ललित शिंदे (वय ३१) सोनाली खडतरे (वय ३०) आणि शिवराज खडतरे (वय ६) हे जखमी झाले आहेत. जखमींवर खोपोली शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
खोपोली येथून लोणावळ्याकडे लोखंडी पाईप घेऊन जाणारा एक ट्रक बोरघाटातून जात होता. अचानक ट्रकचालकाने ब्रेक दाबल्याने जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे ट्रकमधील लोखंडी पाईप निसटले आणि मागून येणाऱ्या स्कूटरवरील महिला आणि एका कारमधील महिलेच्या अंगावर कोसळले. यात दोघींचाही जागीच अंत झाला. बोरघाट वाहतूक मदत केंद्र पोलिस घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ मदतीसाठी घावून आले, दरम्यान, देवदूत यंत्रणा व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे स्वयंसेवक यांनीही मदतकार्य करून जखमींना मदत केली. पोलिस निरीक्षक सचिन हिरे सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.